भयंकर! … म्हणून सुनेने केला सासूचा गळा दाबून खून
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून आणखी एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सासूने मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सुनेनं चक्क सासूचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. सासूने घरात स्वयंपाक बनवला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळालं नाही. या कारणावरून सासू आणि सुनेत वाद झाला या वादातून ही घटना घडली.
सुषमा अशोक मुळे (वय 71 रा.पंचवटी सोसायटी,चाकण) असे हत्या झालेल्या सासूचे नाव आहे. तर सुवर्णा सागर मुळे (वय 32) असे हत्या करणाऱ्या सुनेचे नाव असून चाकण पोलिसांनी तिला अटक केली आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते.
गुरूवारी रात्री मुलीला भाकर न दिल्याच्या रागातून सासू आणि सुनेत पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सुनेनं चक्क नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध झाल्या. काही वेळानंतर सुषमा यांचा मुलगा सागर हा कामावरुन घरी आला. त्यानंतर तिने पतीला सासू फिट येऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले.
दरम्यान, सागरने आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आईचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांना हा खून असल्याची शंका आली. त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती चाकण पोलिसांना दिली. पोलिसांनी सुषमा यांचा मुलगा सागर आणि सून सुवर्णा यांची कसून चौकशी केली असता, आपणच सासूचा खून केल्याची कबूली सुवर्णा हिने दिली.
Comment here