आम्ही साहित्यिकमहाराष्ट्रराज्य

पसारा… मनातल्या आठवणींचा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹पसारा… मनातल्या आठवणींचा 🌹🌹
———————————————-
एक मात्र खरयं की कोणत्याही गोष्टीला योग अन योग्य वेळ यावी लागते ती म्हणजे दरवर्षी दिवाळीला आपण राहात असलेल्या घराची…प्रसंगी दुकानाची…ऑफिसची…गोडाऊनची… साफसफाई आवर्जून करतो मग रंगरंगोटी करून पूर्ण नवीनीकरण करून आनंदात सण साजरा करतो मला पूर्ण माहितीयं मी पण माझ्या शालेय जीवनात म्हणजे पहिली दुसरी काही बी आठवत नाही पण पाचवीला म्हणजे वयाच्या साधारण दहाव्या वर्षापासून अगदी थोडसं पुसटसं समजायला लागतं म्हणजे त्याचं स्मरण आयुष्यभर राहतं असं म्हणतात
मी वयाच्या दहाव्या वर्षापासून माझं दैनंदिन जीवन म्हणजे पोमलवाडी…दौंड…पुणे येथे ताडीवाला रोड…नंतर केशवनगर मांजरी… पर्यंत गाडी येऊन स्थिरावली मी माझा एक प्रवाह वाहता ठेवला त्या प्रवाहामध्ये मला लाभलेल्या सामील झालेल्या व्यक्ती…प्रकृती…आणि विकृती सहज मनातल्या मनात जमाखर्चासारखं टिपण ठेवलं त्या प्रवाहामध्ये काही आंबट…गोड…कडू…तिखट आणि खारट वर्गांची भेट झाली काही कायम आठवणीत राहिले काहींनी दौंडला रेल्वे पकडून मध्येच पुण्यापर्यंत न जाता मध्येच यवत उरळीला प्रवाह सोडला त्यामुळे ते काही एवढं आठवत नाही त्या प्रवासामध्ये मला लाभलेले घर मालक… मित्र परिवार… व्यापारी पेठेतील माझे ग्राहक… राजकारणी व्यक्तिमत्व…समाजातील प्रतिष्ठित मान्यवर…माननीय डॉक्टर…तमाम पत्रकार…वकील… परमार्थातील मान्यवर…होमगार्ड अधिकारी… पोलीस अधिकारी…माझे पोलीस बांधव… रेल्वे सेवेतील अधिकारी वर्ग…आणि आपण म्हणतो आपलं स्वतःचं आयुष्यात झोपडं तरी असावं असं दिलदार व्यक्तिमत्त्वाचे माझे आदरणीय बिल्डर… या आठवणीच्या पसाऱ्याचा लेखाजोखा आणि त्याची पानं सहज चाळली असता हा पसारा दिसला
तर असं म्हणावसं वाटतं की या आठवणींचा आवरावा म्हणतोय कित्येक दिवस झालं पसारा… द्याव्यात टाकून ह्या जुन्या स्मृती आणि झटकून टाकावी आठवणींची कोळीष्टकं…

एक एक आठवण जवळ घेऊन बसलोय ठेवावी का टाकावी पुसून… कारण निवडीच्या या भुतकाळात मी सदैव पडलेला असतो…म्हणून म्हणतो जरा जीर्ण झालेल्या काही जुन्या आठवणी पण आजीच्या गोधडी सारख्या अजून पण उब देतात.. मग कशा टाकू वाटतील बरं… काही लपून ठेवलेल्या अगदी मनाच्या तळाशी फक्त त्या माझ्याशिवाय कोणालाच नाही सांगता येणार काही आठवणी मला घडवणाऱ्या…काही पुन्हा पुन्हा नव्याने जगायला शिकवणाऱ्या…तर काही उमेद आणि मनाला नवीनचं भरारी देणाऱ्या…आठवणींचा पसारा आवरायचा आहे असं मनाशी ठरवून पण निश्चित केल्यावर पण आवरता आवरता माझा मीच त्यात गुंतून जातोय आणि माझा मी मलाच शोधतोय
तरी पण मला सापडलेलो मी अन न सापडलेलो सुद्धा मीच कारण आठवणीचं आणि पसाऱ्याचं एक अतूट नातं असतयं बघा फक्त मनामनात आठवणींचा स्टॉक जास्त झाला की तो पसारा वाटू लागतो कधी कधी अडगळ पण… मग आपलं मन हे पसारा आवरायला धावतं त्याच्याबद्दल कधी कधी वाटतं की बालपणीच्या म्हणजे पोमलवाडीच्या दौंड पासूनच्या आठवणीचा मांडलाय मनामध्ये पसारा आणि थेंबा थेंबानी आठवतयं भांड भरलंय आणि वाटतं कधी कधी मनाला असं पण कि…मी लहानपणीच मोठा झालो होतो आणि तेवढं मात्र बाकी राहिलेलं लहानपण नातवंडात आता शोधतोय कधी घोडा घोडा खेळायला ना…तिला पाठीवर येऊन कधी इच्छा नसताना पण तिच्या प्लास्टिकच्या बॅट वर प्लास्टिकचा हलकासा टाकलेला बॉल आणि त्या बॉलिंगने ना तिला आउट करून बारक्या पोरासारख्या उड्या मारून दोन चार टाळ्या वाजवतोय
मला बालपण कधी होतं का असा प्रश्न पडतो पण आजही बालपण शोधत फिरतोय मी कारण बालपणीची मजा परत येत नाही दुधाची तहान ताकावर भागवावी लागते या पसाऱ्यामधी आणि या पसाऱ्यात.. तवा बघा एक काळ असा होता एकटं राहून पण एकटेपणा वाटत नव्हता आणि आता माणसात राहून पण एकटेपणा एकलकोंडे पणा जाणवतोय कारण बालपणीचे लंगोटीयार सवंगडी केतुरचे माननीय शिवाजीराव पाटील…माननीय भीमराव तांबवे…आमच्या दासा मामाचा रमेश देवकर…कासम मामूचा मेहबूब…ढवानांचा शिवाजी… इंदू… अन कुसुम…या ताया कारण आता त्या आज्या अन पणज्या पण झाल्यात अशी कितीतरी आठवनींच घरटं केलेली आणि ते मराठी शाळेचे गुरुजी थोडसं पुढे गेलं की हायस्कूलचे माननीय बदडे सर…माननीय सादिगले सर… माननीय खांडेकर सर…संपर्कात आलेले के. एम.सय्यद मास्तर…निसळ भावंडं…ती सरूआई… मथीआईची पोमलवाडीला लाभलेली माया…अजून पण एका बाजूने विचार केला तर असं वाटतंय पोमलवाडी म्हणजे माझं माहेर


पुढे आलं दौंड…दौंड काय सगळचं मानवलेलं आयुष्याची जोडीदारीण भाग्यलक्ष्मी दौंडलाच अन दौंडचीच मिळाली… जिंदगीचा रोजगार म्हणजे नोकरी…दौंडलाच मिळाली संसार वेलीला तीन गोड फुलं पण दौंडलाच लागली पुढं पुण्यात आल्यावर वेल बहरला मुला मुलींना मुलं बाळ झाली नंतर किरण बेंद्रे हा पेंटिंग व होमगार्डच्या प्रवाहात काही काळ सामील झाला वास्तव्यात राहिला तिथेही मनासारखी माणसं आणि माणसासारखं प्रेम मिळालं…थोडं फार नाव मोठं झालं…पुण्यात ताडीवाला रोड परिसरात 27 वर्षे वास्तव्य म्हणजे काय साधी गोष्ट नव्हे कारण नोकरदाराच्या मानाने एका ठिकाणी एवढं वास्तव्य दुर्मिळच कारण तिथंही मोहमायेचा गोतावळा निर्माण झालेला होता वतनदारी असल्यासारखं वाटायला लागलं आणि समाजातील वावर आणि योगायोगाने आलेल्या आठवणीचा पसारा त्यात माननीय राजन भागवत… माननीय पिरजादे साहेब… माननीय विठ्ठलराव गायकवाड…माननीय मोहनराव दुधाने…माननीय दिगंबर राऊत… माननीय शशिकलाताई ढोले पाटील.. रेल्वे स्टेशनचे दिवाडकर बंधू… सर्व व्यापारी वर्ग…यांचे मन भरून मिळालेले सहकार्य…आणि एक जुनी म्हण आहे… कधी कधी गोड गुलाबी थंडीत मऊ मखमली गादीवरती माझ्या पक्या घराचं स्वप्न जवा कच्चं वाटू लागतं तेव्हा मला पोमलवाडीला माझी आई म्हणाली होती आरं पोरा चार भिंती आणि वर छत म्हणजे घर न्हव रं जीवापाड जपलेली… माणुसकीची… आठवणीच्या पसाऱ्यातली नाती… म्हणजे घर असतंय रं पोरा…अशा उक्तीप्रमाणे माझ्या संपर्कात आलेले आई मांजराई देवीच्या पदस्पर्शाने पावन अशा मांजरी नगरीतील प्रतिष्ठित व दिलदार व्यक्तिमत्व माननीय दिगंबरराव उर्फ नाना घुले सारख्या महान विभूतींनी दिलेलं स्वत मत्ताचं झोपडं त्यात हा आठवणींचा पसारा सध्या आवरलाय अन आवतरलायं नीटनेटका लावलायं पण

हेही वाचा – डिकसळ पुलावरील वाहतूक बंद केल्याने वीस गावातील रुग्ण, विद्यार्थी, नागरिकांचे हाल; हलक्या स्वरूपात जीवनावश्यक वाहतूक सुरू ठेवण्याची मागणी

करमाळा तालुक्यातील ‘हा’ रस्ता मंजूर झाल्याने गावकऱ्यांनी केला पेढे वाटून आनंदोत्सव; ४ कोटी ६६ लाख रुपये मंजूर
पुन्हा एकदा खरं सांगतो की आवरावर करताना सगळा पसारा बघून डोळ्याच्या पापण्या किंचित पानावल्या आणि सारा चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्याबद्दल अजून जर थोडंसं सांगायचं झालं तर पहिली समोर येते जुनी आठवण आणि त्याचा मनामनात झालेला अस्ताव्यस्त पसारा म्हणजेच आयुष्याचा श्वास म्हणजे आठवणीच असतात त्या आठवणीमध्ये इतकी जादू असते की तासंतास त्यात रमायला होतं माझ्या आवडीचं काम म्हणजे जुन्या आठवणींचा पसारा घेऊन बसणं आणि त्यात हरवून जाणं एक वेळ तेच आपलं भाव विश्व निर्माण होतं माझी बायको म्हंजे माझ्या पोरांची आई आणि मी त्या लहान मुलांचे ते लहानपणीचे कपडे कुठल्यातरी बोचक्यात दृष्टीस पडल्यावर त्यांनी वापरलेला पहिला पावडरचा डबा… मुलं पोटात असताना भिंतीवर लावलेलं ते लॅमिनेशन केलेलं गोड हसणाऱ्या बाळाचं पोस्टर… त्याच्या हातापायात घातल्याले दागिने…अशा अनेक गोष्टी त्या मनामध्ये जपून ठेवलेल्या आहेत
कधीतरी त्या वस्तू आम्ही दोघेही आवर्जून काढतो आणि प्रत्येक क्षण नव्याने जगतो माझ्या बायकोसोबत मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळचं हसू येतं आणि त्या आठवणींच्या पसाऱ्यात आम्ही दोघं पण पुन्हा एकदा नव्याने भूतकाळात हरवून जातो… हरवून जातो…त्या मोरपंखी आठवणीत रमण्याचं सुख काही औरचं असतं ज्याप्रमाणे या भूतकाळातील आठवणी नकळत निघून गेल्या कि वेळेबरोबर मनातील आठवणींचा पसारा आवरावा लागतो ना कधी कधी…असं अवसं पुनवंला… झालेल्या आठवणींच्या विरहाच्या वेदना कोणाला तरी आज सुद्धा ठणकावून सांगाव्याशा वाटतात कारण असं ठणकावून सांगितलं तर ते माझ्या डोळ्याला सहन होत नाही कारण त्या आठवणी काठावर अश्रूचा पूर घेऊन येतात तवा लागलीच पहिल्यांदा डोळ्याच्या कडा ओल्या होतात
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
किरण बेंद्रे
पुणे
संपर्क… 7218439002

litsbros

Comment here