मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर, दोन तारखेला प्रवेश, बाळराजेनां आमदारकी.?
मोहोळ; गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः अजिंक्यराणा आणि बाळराजे पाटील यांच्या मनात पक्षाबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. विरोधात बोलणाऱ्या पक्षातील लोकांना वरिष्ठ नेत्यांकडून बळ दिले जात असल्याचा आरोप पाटील गटाकडून वारंवार केला जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून राजन पाटील व त्यांच्या सुपुत्रांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे उमेश पाटलांचा जनता दरबार राजन पाटलांना जाचक ठरू लागला आहे. उमेश पाटील यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्याबाबत पक्षनेतृत्वाला सांगूनही ते सुरू राहिल्याने पाटील कुटुंबीय राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर कमालीचे दुखावले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होत असलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश अखेर ठरला आहे. येत्या दोन ऑगस्ट रोजी राजन पाटील आपल्या संपूर्ण गटासह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द भाजपकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पण, भाजप प्रवेशाची अफवा असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत कायम राहू, असे मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माजी आमदार राजन पाटील यांच्यासारख्या एकनिष्ठ असणाऱ्या नेत्याची कोंडी झाली, या सर्व गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोचल्या आहेत, परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. वरिष्ठांनी बघ्याची भूमिका घेणे म्हणजे अप्रत्यक्ष उमेश पाटील यांना बळ देण्याची भूमिका असल्याची चर्चा आहे.
त्यातूनच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी गेल्या साधारण पंधरा दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पोस्ट करीत भाजप प्रवेशाचे संकेत दिले असल्याची चर्चा तालुक्यात आहे.
आम्ही सत्तेच्या पाठीमागे पळणारे नाहीत : राजन पाटील
सत्ता येत असते, जात असते, पण आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाहीत. आम्ही एका विचाराने प्रेरित झालो आहोत. त्यामुळे सत्तेच्या बाजूने आम्ही जाणारे लोक नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत आम्ही कायम राहू.
आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार ही अफवा आहे. तशी वेळ आल्यास आम्ही निश्चितपणे मतदारांना सांगू. सध्या माध्यमांमधून भाजप प्रवेशाच्या बाबतीत केवळ अफवा पसरवल्या जात आहेत, असे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.
Comment here