**** मुरलेलं लोणचं ****
जरासा थोडासा विचार केला की आपण म्हणजे आत्ताची पिढी ज्यांचा जन्म 1950 ते 60 च्या आसपासचा आपण यावेळी एवढाच मर्यादित विचार करू कारण त्यांच्या अगोदरचा हा विचार करायची आपली काय बुद्धी चालत नाही आणि असल्या काटेतारेच्या कुंपणा बाहेरचा हा विषय आहे म्हणजे बघा आता आपण आज 60 ते 70 च्या घरात म्हणजे आपले आईबाप 80 ते 90 च्या दरम्यानचे म्हणजे आपल्या वयापेक्षा साधारण वीस-पंचवीस वर्षे जास्त त्यांनी त्यांच्या काळात काय केलं ते आपण काय पाहिलेलं नाही
आणि आपण जे करतोय ते त्यांना खरं वाटत नाही कारण तो त्यांच्या वयोमानाचा अविष्कार आहे पण एक मात्र खरयं की कोणत्याही घरातील वृद्ध आई-वडील म्हणजे खरचं मुरलेलं लोणचं असतयं आणि त्यांचा मला… तुम्हाला… आणि सर्वांना अभिमानच असतोय त्यांनी आपल्यापेक्षा 20-25 उन्हाळे आणि पावसाळे…सावली आणि ऊन जास्त पाहिलेले असतात
आता साधं उदाहरण बघू लग्न करायचं म्हटल्यावर आई बापाला सकाळपासूनच खोलीत बंद करून ठेवणारी पण आहेत नाहीतर काही पण निमित्त काढून नाहीतर यात्रा कंपनीमध्ये तीर्थक्षेत्राला बाहेरगावी पाठवायचं असा त्यांचा प्रोग्राम ठरलेला असतो कारण का तर ही म्हातारं लग्नाच्या बैठकीत काही पण बोललं…त्याचा काही नेम नाही आरं ती कसा काय…काय पण बोलल तुला काही तरी करून लग्न पटकन जमवायची घाई झालेली असती आणि भविष्यामधी घाई केली आणि अंगलट आली असं म्हटल्याप्रमाणे पश्चाताप करायची पाळी येते पण ती म्हातारं पहिलं विचारतयं मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ असो मुलीची किंवा मुलाची आई… तिचं माहेर …तिच्या भाऊजईच्या भावाच्या सासरवाडीचं पुराण ऐकणार आणि मग इतक्या खोलात गेल्यावर काय बिघडलं…इतक्या बारकाईनं चौकशा करून लग्न जमवणार…नुसतं तुला नाचता येतं का…तुला गाणं म्हणता येतं का तिला काय स्टेजवर प्रोग्राम सादर करायचा आहे काय पण यातलं ह्यांना एक तर नसतंय डोकं तर येणाऱ्या सुनेला किंवा आपल्या पोरीला पहिलं महत्त्वाचं काय म्हणजे तिचा संसार…नवरा… सासू-सासरे…दीर…नणंदा… यांना सांभाळणं पण ही आता काय करतात पहिलं एखाद्या एकराचा काटा काढायचा मग शायनिंग नी लग्न उरकायचं तिच ती पहिली आईबापं व्हती त्यांनी तर दोन पोरं आणि तीन पोरींची लग्न केली…झोपडं व्हतं त्याचं पक्क घर बांधलं…शेतात विहीर काढली… पाईपलाईन पण टाकली… जित्राबं पण वाढवली… दोन रुपये कर्ज पण नाही…आणि गुंठाभर इकलं पण नाही…तर असं ही मुरलेलं लोणचं आता ही मुरलेलं लोणचं जी असतं ती म्हणतात नुसत्या उन्हानी केसं पांढरी व्हत नसत्यात
अनुभव पाठीशी असतो आणि त्यांनी त्यासाठी परिस्थितीनुसार स्वतःचे तुकडे तुकडे करून व त्याला तिखट…मीठ…हळद…हिरव्या मिरच्या…सगळ्या अंगाला लपेटून…उकळून गार केलेले तेल…अंगावर ओतून घेऊन…आपल्याला माहितीच आहे साध्या जखमेवर जर मीठ लागलं तर काय होतंय हे तर पुडेच्या पुडे मीठ अंगावर पावडर लावल्यावाणी लावून घ्यावं लागतयं आणि जिवाचा आणि मनाचा कोंडमारा करून स्वतः त्या काचेच्या बरणीत कोंडून घ्यावं लागतयं पण एक आहे ही खरं मुरलेलं लोणचं… त्याच्या जीवनाच्या यशामागे भक्कम उभी असती ती त्याची गृहलक्ष्मी अर्धा वाटा तिचाही
खरंच कारण मुरलेला हात असल्याशिवाय ही समदं शक्य नाही कारण तसं पाहिलं तर स्वयंपाक करणे जशी कला आहे तसंच स्वयंपाक घरात वावरणं ही पण एक कला आहे कारण महिलांचा आणि क्वचित पुरुषांचा खूपसा वेळ स्वयंपाक घरात जातो खरं तर स्वयंपाक घरावरून त्या संपूर्ण घराची ओळख पटते आणि हे नीटनेटके देखणे स्वयंपाक घर चालवायला गरज असते ती मुरलेल्या हातांची आपली खाद्य परंपरा ही आपल्या देशाची खासियत आहे आणि ती परंपरा टिकवून ठेवणे ही आणखी एक खासियत आहे आपल्याकडे स्वयंपाक करायच्या खूप पारंपरिक पद्धती आहेत
प्रत्येक राज्यात… प्रांतात जास्तीत जास्त धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चवदार… चमचमीत… व चविष्ट जेवण तयार करण्यात येतं काही काही पदार्थ तर पिढ्यान पिढ्या पारंपारिक पद्धतीने जसेच्या तसे अजूनही बनत आहेत पंचपक्वान्नामध्ये श्रीखंड… गुलाबजाम…रसगुल्ले व बासुंदी काही चमचमीत भाज्या मध्ये भरली वांगी…रस्से… उसळी… छोले भटूरे… मांसाहारी मध्ये चिकन… मटन…तंदूर… तसेच इडली.. डोसा… मेदू वडा सांबार असे अनेक प्रकार… ही परंपरा पण मुरलेला हातचं टिकवते आणि या मुरलेल्या हातांच्या पोळ्यांचा आकार गोलच असतो आमटी फूळूक पाणी होणार नाही किंवा चटण्या…कोशिंबीर…भाज्या…वाहून जाणार नाहीत…मुरलेला हात स्वयंपाक करताना कधीच भांड्यांचा ढण ढण आवाज करीत नाही… कढईतला पदार्थ कसा कापसावानी हलवला जातो रवीने दही घुसळताना एक लयबद्ध आवाज येत राहतो
भात कधीच चिकट होत नाही किंवा तांदूळ ताटात वाजणार नाही…मुरलेल्या हाताला तवा… कढई…कुकरचा चटका बसत नाही किंवा चटक्याचे काळे डाग पण हातावर उमटत नाहीत आणि विशेष हे की मुरलेले हातच खबरदारी घेतात साधं लोणचं करताना पण आधी ज्याचं लोणचं घालायचं ती जिन्नस म्हणजे कैरी… लिंबू… मिरची… फ्लावर… गाजर…व्यवस्थित निवडून स्वच्छ करून देठ काढून धुवून पुसून थोडा वेळ वाळत ठेवणार त्याच्या जोडीला चिरायची विळी ती काचेची बरणी व ताट सुद्धा स्वच्छ धुऊन पुसून घेणार व कोरडे करणार मग चिरून मसाला घालून लोणचं तयार करण्यास तयार…तरी थोडसं पण पाणी राहिला नको म्हणून पेटत्या गॅसवर सुकवून घेणार मसाला घालून लोणचं तयार मसाला पण घरीच बनवणार तिखट… हळद…मीठ… पण हलके घेतल्यावर गरम करून घेणार सगळं असं निर्जल करणार मग काय बिशाद लोणचं खराब होईल ती बरणी ठेवायची पण विशिष्ट पद्धत खाली तळाशी मिठाचा थर… वरती लोणचं घालून …सर्वात वरती पुन्हा मिठाचा थर …त्या बरणीच्या उघड्या तोंडावर स्वच्छ धुतलेला पांढरा कपडा त्याची कड एका बाजूला फाडून व्यवस्थित बांधणार आणि नंतर बरणीचं झाकण लावणारा हा मुरलेला हातच असतो
मुरलेल्या हाताला वयाचं बंधन नसतं अनुभवाचे शहाणपण…आत्मविश्वास…आणि स्वयंपाकाची आवड असेल तर पुरे मसाला करताना प्रत्येक घटक व्यवस्थित निवडून साफ करून वेगवेगळे भाजून एकत्र करून मगच मिक्सरमध्ये बारीक करून ठेवणार तेव्हाच तो मसाला खमंग होणार मुरलेल्या हाताचा स्वयंपाक झटपट आणि खमंग तसेच चविष्ट पण होणार पाच माणसांचा स्वयंपाक एका तासाच्या आत करावा तर तो मुरलेल्या हातानेच आणि ह्या हाताची अशी पद्धत आहे कुठले वेळी काय करायचं हे त्या हातांना जवळजवळ पक्कं माहित असतं आता बघा या पद्धतीने पायऱ्या पायऱ्यांनी स्वयंपाक केला तर काय बिशाद स्वयंपाकात जास्त वेळ जाईल
सगळ्यात पहिलं कणिक भिजवून बाजूला ठेवली…डाळ तांदूळ धुऊन कुकर लावला… कुकरची शिट्टी होईपर्यंत…भाजी चिरून ठेवली… शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक करून…दुसऱ्या गॅसवर भाजीला फोडणी टाकून शिजायला ठेवली… तोपर्यंत कुकरची मंद गॅसवर ठेवायची वेळ संपलेली…कुकर उतरवून त्यावर पोळ्यासाठी तवा… तवा तापेपर्यंत पोळपाट लाटणं फुलक्या असतील तर चिमटा…पीठ.. तेल …यांची जमवाजमव… पोळ्यांना सुरुवात करण्यापूर्वी भाजी ढवळून…मीठ मिरची खोबरं इतर वाटण व चिंचेचा कोळ घालून मंद आचेवर शिजेपर्यंत ठेवलं… की तोपर्यंत तवा तापून तयार…पोळ्यांना सुरुवात केली…की सलग दहा-पंधरा मिनिटात पोळ्या होतात…एका पोळीला जास्तीत जास्त दोन मिनिटे लागतात…पोळ्या झाल्या की कढईतील भाजी एका छानशा पातेल्यात काढून डायनिंग टेबलवर झाकून ठेवली…त्याच कढईत आमटी करण्यासाठी तवा उतरून आमटी टाकता येते
जी काही डाळ उसळ असेल तिला फोडणी टाकली…मिरच्या कोथिंबीर मसाला इतर गोष्टी टाकून आमटी तयार…पोळ्या झाल्यावर त्याच गरम तव्यावर आमटीचा मसाला इतर वाटण परतून घेता येईल…आमटी उकळेपर्यंत ओटा आवरून…पोळ्यांची परात… पोळपाट…लाटणं… धुवून जागेवर ठेवायचं… उकडलेल्या आमटीवर झाकण ठेवलं की काम फत्ते…जेवायच्या वेळेला फक्त गॅस पेटवायचा…जेवायच्या वेळेस गरम गरम आमटी खायला तयार… कितीसा वेळ लागला…आहे ना मुरलेल्या हाताची कमाल… या मुरलेल्या हाताची मोजमापं पण कशी तर चिमूटभर… ओंजळभर… मूठभर… सगळा कारभार अंदाज पंछे या मुरलेल्या हाताचा अंदाज एवढा पक्का असतो की पदार्थ कधी आंबट…खारट… तिखट व कडू होणार नाही समतोल चवीचा रुचकर पदार्थ करावा तर मुरलेल्या हातानेच…पदार्थ शिजला का नाही हे त्या मुरलेल्या हातालाच कळणार…ते पण नुसतं बघून… काय घातलं आणि काय राहिलं हे मुरलेल्या हातांनाच माहित…टीव्ही बघताना पण कधीच वेळ वाया घालवत नाहीत… भाजी निवडणे…लोणी काढणे…डाळी उसळी निवळून घेणे… ही काम टीव्ही बघता बघता होतात बरं का
उन्हाळ्याची कामं पापड…सांडगे वगैरे सकाळी लवकर उठून नाश्त्याच्या वेळेपर्यंत उरकून टाकणारे मुरलेले हातच…पुन्हा सगळी रोजची काम वेळच्यावेळी करण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला जर मुरलेल्या लोणच्याच्या प्रमाणेच मुरलेला हात पहायचं म्हटलं तर एक व्याख्या… त्या चेहऱ्यावर निसर्गाने काढलेलं सुरकुत्याचे डिझाईन आणि त्या गोऱ्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर कपाळी मोठं कुंकू आणि ते दोन हिरवे गोंदणाचे ठिपके… डोक्यावर थोडासा कापूस ठेवल्यावानी…या माऊलीचं वय जरी 70-80 असलं तरी मन अजून पण चाळीस-पन्नासचचं असतंय त्यो खरा मुरलेला हात अशा या मुरलेल्या लोणच्याचं व मुरलेल्या हाताचं कौतुक आपण नाही तर मग कोण करणार
**************************************
किरण बेंद्रे…. पुणे
शब्दांची मेजवानी
7218439002
Comment here