अभियांत्रिकी सेवा परीक्षेत करमाळा तालुक्यातील शेतकरीपुत्राचे यश; अक्षयने पुर्ण केले आईवडिलांचे स्वप्न
करमाळा(प्रतिनिधी ) ;
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत कविटगाव येथील अक्षय अनिल चौधरी याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्याची उपविभागीय जलसंधारण अधिकारी (वर्ग 1) पदी मृदा व जलसंधारण विभागात निवड झाली आहे.
त्याच्या या यशामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अक्षयचे प्राथमिक शिक्षण कविटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले आहे तर माध्यमिक शिक्षण भारत हायस्कूल, जेऊर येथे तर अभियांत्रिकीचे शिक्षण बारामती येथील विद्याप्रतिष्ठान येथील काॅलेजमध्ये झाले आहे. वडिल अनिल चौधरी हे शेती करतात तर आई गृहिणी आहे. अक्षयने अत्यंत परिश्रमानं आणि जिद्दीनं अनेक वर्ष अभ्यास करून ही परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. या परीक्षेत राज्यातून अक्षयने 48 वी रँक प्राप्त केली आहे.
आईवडिल आणि सहका-यांमुळेच भरीव यश मिळवले असुन
आपल्या यशात आई-वडिल, मोठा भाऊ दीपक तसेच गावक-यांचाही मोलाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले. अक्षयला स्पर्धा परीक्षेसाठी वेळोवेळी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल सुतार, देविदास चौधरी (राज्य उत्पादन शुल्क विभाग), वस्तु व सेवा कर अधिकारी शिवाजी पांडव, अरुण शेंडगे, ब्रह्मदेव चौधरी, बालाजी चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आपल्या मुलांनी यश मिळवावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्याप्रमाणे माझ्या मुलानंही प्रचंड मेहनतीनं यश मिळवलं. यात आम्हाला सर्वांनाच आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया अक्षयचे वडील अनिल चौधरी यांनी दिली.
जिद्द , चिकाटी व कष्ट याच्या जोरावर मी हे यश संपादन केले आहे. मी माझ्या सोबत येणा-या सर्वांना एमपीएससी च्या परिक्षेबाबत आपण विना अपेक्षा मार्गदर्शन करू जेणेकरुन शेतकरी व कष्टकरी विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.
…अक्षय चौधरी, नुतन उपविभागीय जलसंधारण अधिकारी, कविटगाव, करमाळा
Comment here