करमाळयाच्या सुपुत्राच्या ‘या’ चित्रपटाचं जगभरात कौतुक; ५७ पुरस्कारांसह ११ देशात गवगवा
प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या’ चित्रपटाचे अकरा देशांत कौतुक अन् 57 पुरस्कार
आयकर विभागाचे सह आयुक्त विठ्ठल मच्छिन्द्र भोसले यांच्या दिग्दर्शन आणि कथानकाला एकूण 23 पुरस्कार
‘फिरस्त्या’ ….
तूझं तूच शोध रान ….
म्हणून एक भटकंती …. एक धडपड….
एका जीवाची …..
आपल्या लोकांपासून दूर …. दूरवरचा प्रवास ….
कित्येक रस्ते पालथे घातले …. मग मिळालं का हवं ते ?
“धडपड करणाऱ्यांच्या हाताला काहीतरी लागतं भाऊ”.. असं म्हणणारा नायक आणि ‘मोठी स्वप्नं पाहणं आणि पाहिलेली स्वप्नं सत्यात उतरवण्यातील वास्तविकता’ दर्शविणारा तसेच सध्याच्या ‘नैराश्यमय’ ‘न्यूनगंडात्मक’ आणि ‘नकारात्मक मानासिकते’ विरोधात ‘प्रेरणादायी’ आणि ‘सकारात्मक विचार’ प्रखरतेने मांडणारा लेखक आणि दिग्दर्शक विठ्ठल मच्छिन्द्र भोसले यांचा “फिरस्त्या” चित्रपट लवकरच येत आहे.
“फिरस्त्या” चित्रपट हा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यशापर्यंत पोहोचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची प्रेरणादायी गोष्ट आहे. ग्रामीण भागात निरक्षर आणि आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाची खऱ्या अनुभवांवर आधारित ही गोष्ट आहे.
“फिरस्त्या” म्हणजे एक विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी वेगवेगळी गावं – शहरं अशी भटकंती करणारा, फिनिक्स पक्षासारखी राखेतून आकाशाकडे झेप घेऊ पाहणारा ध्येयवेडा मुलगा.
प्रदर्शनापूर्वीच अकरा देशांतील पंचवीस इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल्स मध्ये “फिरस्त्या” चे कौतुक
प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या‘ ने भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया या 11 देशांमधील 26 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण 57 पुरस्कार जिंकलेले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट- 19 पुरस्कार, विठ्ठल मच्छिन्द्र भोसले यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- 17 पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पटकथा – 6 पुरस्कार, समीर परांजपे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता- 6 पुरस्कार, समर्थ जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता- 1 पुरस्कार,
अंजली जोगळेकर यांना सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री 1 पुरस्कार, गिरीष जांभळीकर यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ३ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण- २ पुरस्कार, रोहित नागभिडे यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट संगीतकार 1 पुरस्कार आणि श्री प्रमोद कहार यांना सर्वोत्कृष्ट संकलन 1 असे पुरस्कार मिळालेले आहेत.
तसेच ‘फिरस्त्या‘ ची फायनॅलिस्ट म्हणून अमेरिका, रशिया, फ्रान्स , स्वीडन आणि तुर्कीया 5 देशांमधील 5 चित्रपट महोत्सवांत निवड झाली आहे.
या व्यतिरिक्त“फिरस्त्या” चे भारत, अमेरिका, युनाइटेड किंग्डम, जर्मनी, अर्जेन्टिना, स्पेन, स्वीडन, व्हेनेझुएला, चिली, लिथुआनिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो या 11 देशांतील एकूण 13 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ऑफिसिअल सिलेक्शन झालेलं आहे.
“फिरस्त्या” चित्रपट 19 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, 2021 मध्ये मराठी चित्रपट स्पर्धा विभागात पहिल्या सात चित्रपटांमध्ये असून त्याचा अंतिम निकाल येणे बाकी आहे.
विशेष बाब म्हणजे साता सुमुद्रापार असलेल्या दक्षिण अमेरिका खंडातील ‘अर्जेन्टिना’ या देशाची राजधानी ‘ब्युनोस आयर्स’ मधील ८ व्या कॉन्स्ट्रुइर सिने इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, २०२१ मध्ये “फिरस्त्या” चित्रपटाची निवड झालेली आहे. ‘ब्युनोस आयर्स’ हे अर्जेन्टिना देशातील १ कोटी ५६ लाख लोकसंख्या असलेले सर्वात मोठे शहर आहे. विशेष म्हणजे या फेस्टीव्हलच्या ६ विभागांतील स्पर्धेसाठी जगभरातील ३५ देशांतील एकूण २५०० हून अधिक चित्रपटांनी अर्ज केला होता.
या २५०० चित्रपटांपैकी केवळ ४४ चित्रपटांची निवड स्पर्धा विभागात करण्यात आलेली आहे. त्यामध्ये “फिरस्त्या” ची देखील निवड झालेली आहे. इंटरनॅशनल फिचर फिल्म फिक्शन कॉम्पिटिशन या स्पर्धा विभागात तर पहिल्या ६ चित्रपटांमध्ये “फिरस्त्या” हा एकमेव भारतीय तसेच मराठी चित्रपट आहे. या फेस्टीव्हलच्या माध्यमातून पहिल्यांदाच “फिरस्त्या” चे स्पॅनिश भाषेच्या सबटायटल द्वारे संपूर्ण अर्जेन्टिना देशा मध्ये १३ ते २९ मे, २०२१ दरम्यान स्क्रिनिंग आणि टेलिकास्टिंग झालेले आहे. मराठी चित्रपटाच्या दृष्टीने ही एक अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल.
लेखक आणि दिग्दर्शक विठ्ठल मच्छिन्द्र भोसले यांचा “फिरस्त्या” हा पहिलाच मराठी चित्रपट
‘फिरस्त्या’ चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विठ्ठल मच्छिन्द्र भोसले यांनी चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन याचे कसलेही प्रशिक्षण न घेता केवळ इंटरनेट वर उपलब्ध माहिती आणि यु -ट्यूब वरील व्हिडिओ पाहून हा चित्रपट बनवला आहे.
हा चित्रपट बहुतांशी त्यांच्याच जीवनातील अनुभवांवर आधारित आहे. श्री भोसले यांचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी नंबर ३ आहे. आई वडील हे निरक्षर शेतमजूर आहेत. त्यांच्या कुटुंबातील ते पहिलेच पदवीधर आहेत. श्री भोसले हे भारतीय राजस्व सेवा (आयआरएस) चे अधिकारी असून सध्या ते ज्वाईंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, पुणे या पदावर कार्यरत आहेत.
श्री भोसले हे वयाच्या अठराव्या वर्षापासूनच लेखन करत आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा पहिला लेख, कथा आणि कविता वर्तमानपत्रातून प्रकाशित झाली तर एकविसाव्या वर्षी पुणे आकाशवाणी वर त्यांचे कथाकथनाचे तीन कार्यक्रम झाले.
निर्माती डॉ स्वप्ना विठ्ठल भोसले यांनी त्यांच्या ‘झुंजार मोशन पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेद्वारे “फिरस्त्या” चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. “फिरस्त्या” चित्रपटात ‘ सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत “अभ्या” (अभिमन्यू जहागीरदार) ची भूमिका केलेले समीर परांजपे, हरिष बारस्कर, ‘तेरी लाडली मैं’ या मालिकेत प्रमुख भूमिका केलेली मयूरी कापडणे, ‘देवमाणूस’ या मालिके मधील अंजली जोगळेकर, बाल कलाकार – श्रावणी अभंग, समर्थ जाधव, आज्ञेश मुडशिंगकर यांनी भूमिका केल्या आहेत. “
फिरस्त्या” साठी पार्श्व गायन: आदर्श शिंदे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत दिग्दर्शन : रोहित नागभिडे, देवदत्त मनिषा बाजी, पार्श्व संगीत: रोहित नागभिडे, गीतकार: गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख, छायाचित्रण: गिरीश जांभळीकर, ध्वनी संयोजन: राजेंद्र त्यागी, साऊंड डिझाइनर: पियुष शहा, संकलन: प्रमोद कहार, डी आय कलरिस्ट : विनोद रविंद्र राजे, व्ही एफ एक्स : सारंग गंगापूरकर आणि विनोद साठे यांनी केलेले आहे.
“फिरस्त्या” ला पुढील इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल्स मध्ये पुरस्कार मिळालेले आहेत:
१) न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड्स (NYIFA )- २०२१
२) मॉस्को, रशियातील ‘युरेशिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल-२०२१’
३) अमेरिकेमधील ‘एक्कोलोड ग्लोबल फिल्म कॉम्पिटिशन, २०२१’
४) लंडन चा ‘स्क्रीन पॉवर फिल्म फेस्टीव्हल, २०२१’
५) फ्रान्स चा ‘पॅरिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल- २०२१’
६) लंडन चा ‘फाल्कन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, २०२१’
७) स्पेन चा ‘बार्सिलोना इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल- २०२१’
८) स्वीडन (युरोप) चा ‘लुलिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, २०२१’
९) टोकियो, जपान मधील ‘गोल्डन हार्वेस्ट फिल्म फेस्टीव्हल -२०२१’
१०) सिंगापूरचा ‘वर्ल्ड फिल्म कार्निवल, २०२१’
११) नोएडा (दिल्ली) येथील ११वा ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल, २०२१’
१२) फ्रान्स मधील पॅरिसचा ‘उबेर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, २०२१’
१३) ‘स्वीडन फिल्म अवॉर्ड्स -२०२१’
१४) झेक रिपब्लिक (युरोप) मधील ‘प्राग (Prague) इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, २०२१’
१५) स्वीडन मधील ‘स्टॉकहोम सिटी फिल्म फेस्टीव्हल (SCFF) २०२१’
१६) इंग्लंड मधील ‘सी के एफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, स्विंडन २०२१’
१७) रोमानिया (युरोप) मधील ‘ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टीव्हल – २०२१’
१८) पश्चिम बंगाल मधील ‘टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, २०२१’
१९) तमिळनाडू मधील ‘रामेश्वरम इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, २०२१’
२०) कलकत्ता कल्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, २०२१
२१) पॉंडिचेरीचा ‘इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, २०२१’
२२) कोलकातामधील ‘व्हर्जिन स्प्रिंग सिनेफेस्ट, २०२१’
२३) अंदमान आणि निकोबार मधील ‘पोर्ट ब्लेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, -२०२१’
२४) तामिळनाडू मधील ‘उरुवत्ति इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल- २०२१’
२५) पॅरिस, फ्रान्समधील हल्लूसिनिया फिल्म फेस्टीव्हल- २०२१
26) म्युझियम टॉकीज इंटरनेशनल फिल्म फेस्टीवल, कोची, केरळ 2021
Comment here