करमाळा तालुक्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता लवकर दुष्काळ जाहीर करा; ॲड.राहुल सावंत यांची मागणी

करमाळा तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता लवकर दुष्काळ जाहीर करा; ॲड.राहुल सावंत यांची मागणी

पाऊसाअभावी उडीद, सोयाबीन ,कपाशी, तुर ,बाजरी, मका, कांदा, सूर्यफूल ही पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी

करमाळा(प्रतिनिधी)) : – यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. सप्टेंबर महिना आला तरी पाऊस पडत नसल्याने व उत्पन्न येणारच नसल्याची खात्री झाल्याने करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणचे शेतकरी यांची उडीद, तुर, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, कांदा, सूर्यफूल, कपाशी अशी उभी पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी. त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा, तात्काळ दुष्काळी उपाययोजना द्याव्यात अशी मागणी पंचायत समिती सदस्य व हमाल पंचायत अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी केली आहे.

संपूर्ण पावसाळ्यात जून /जुलै महिन्यात एक दोन पाऊस वगळता संपूर्ण पावसाळा विना पावसाचा निघून गेला आहे. ऑगस्ट महिना संपायला येऊनही तालुक्यात चांगला व अपेक्षित पाऊसच झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून मोठ्या उमेदीने आर्थिक भार उचलून शेतकर्‍यांनी शेती मशागत करून रब्बी व खरीप पिकांची लागवड केली. यावर्षी पाऊस चांगला पडेल व उत्पन्न चांगले येईल या आशेने शेतकर्‍यांनी कापूस, मूग, उडीद, मका, सोयाबीन, तुर , बाजरी, कांदा, सूर्यफूल अशा मुख्य पिकांची लागवड केली. महागडी बियाणे व कृषी निविष्ठा खरेदी करून शेतीची मेहनतीने मशागत केली.

परंतु जून महिन्यात पाऊसच न झाल्याने पहिली केलेली लागवड वाया गेली व आर्थिक संकटाचा भार पडला. मात्र जून, जुलै महिन्यात एक दोन पाऊस वगळता चांगला पाऊस झाला नाही. मात्र पावसाने पुन्हा पाठ फिरवून हुलकावणी दिली.

शेतकर्‍यांनी पिकांना जीवदान म्हणून महागडी खते व फवारणी देखील केली. मजूर लावून शेतीची मशागत देखील करून घेतली. जून पासून पाऊस नसल्याने व मे महिन्यासारखे कडक उन्हाळ्याचे ऊन पडत असल्याने खरीपाचे पिके ही उन्हाने कोरडी व जळत जाऊ लागलीत.

त्या पिकांची खुंटलेली वाढ होणार नाही व उत्पन्न येणार नसल्याचे लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी लागवड केलेली पिकांची उभे पीक करपून गेल्यामुळे वखरणी करून काढून टाकुन दिली आहे.

काही शेतकर्‍यांनी बटई व उक्ते पध्दतीने शेती केली. त्यात त्यांना डबल आर्थिक फटका बसला आहे.

पावसाच्या अडीच ते तीन महिन्यांच्या मोठ्या दडीमुळे खरीप पिकांची मोठी हानी होऊन संपूर्ण हंगामच वाया गेल्याने शेतकर्‍यांची आर्थिक गोची निर्माण झाली आहे. परिणामी कुंटुंबाचा गाडा कसा हाकलावा असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

शासनाने परिस्थितीची गंभीरता ओळखून व शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करून सोबत काढलेल्या पीक विम्याची संपूर्ण भरपाई रक्कम तात्काळ शेतकर्‍यांना देऊन त्यांच्या ह्या आर्थिक संकटात निःपक्षपातीपणे मदत करावी अशी मागणी ॲड. राहुल सावंत यांनी केली.

हे निवेदन मा . मुख्यमंत्री, मा . उपमुख्यमंत्री, मा. पालकमंत्री , मा. कृषिमंत्री , मा. विरोधी पक्षनेते, मा. आमदार, मा . जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार यांना देण्यात आले.

karmalamadhanews24: