करमाळा तालुक्यातील ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने दिले जीवनशिक्षणाचे धडे; अधिकाऱ्यांनी केले कौतुक!

करमाळा तालुक्यातील ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने दिले जीवनशिक्षणाचे धडे; अधिकाऱ्यांनी केले कौतुक!

(करमाळा प्रतिनिधी): जि.प. प्रा. केंद्रशाळा पोथरे ही करमाळा तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध आहे .विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यामधे ही शाळा नेहमीच अग्रेसर असते.

   असाच एक नाविण्यपूर्ण उपक्रम काल शाळेत राबविण्यात आला. यामधे इ. सहावीमधील विद्यार्थीनी कु. सानू समाधान भालके हिने विद्यार्थ्यांना झाडू बनवण्याचे प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थाने जीवन शिक्षणाचे धडे दिले .

   या विद्यार्थीनीने झाडू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्याची कटाई, झोडपणी, बांधणी, फिनिशिंग या सर्व क्रिया आपल्या प्रात्यक्षिकाद्वारे करून प्रत्यक्ष झाडू कसा बनवला जातो हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. 

     यामुळे विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी नुसते पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून व्यावसायिक शिक्षण ही गरजेचे असते याचा अनुभव प्रत्यक्ष मिळाला.

    ‘जीवनशिक्षण’ चा मूळ हेतू हाच आहे कि शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेलं असावं . 

खरंतर श्रमप्रतिष्ठा या मूल्याची रुजवणूक विद्यार्थ्यांमधे शालेय जीवनामधे व्हायलाच हवी जेणेकरून त्यांना कोणतेही काम कमी प्रतीचे वाटणार नाही आणि व्यावसायिक शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमधे सहकार्याची भावना, वेळेचं नियोजन, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, नम्रता इ. मूल्ये ही अगदी सहजपणे आणि नकळतच विकसित होतील . मुलांना कोणत्याही कामाबद्दल तिटकारा वाटणार नाही आणि त्यांची शिक्षण प्रक्रिया ही नक्कीच आनंददायी बनेल. 

त्यामुळे शालेय वयात पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना असे व्यावसायिक शिक्षण ही मिळणं तितकंच गरजेचे असते . असे जीवनशिक्षण मुलांना जीवन जगण्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी खऱ्या अर्थाने सक्षम बनवत असते. म्हणूनच ज्ञानाबरोबर कौशल्य संपादन करणे ही तितकेच महत्वाचे ठरते.

     यानुसार ‘ सानू ‘चा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रेरक ठरावा या दृष्टीने मुख्याध्यापक श्री. गजेंद्र गुरव आणि सानूच्या वर्गशिक्षिका श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.

   कु. सानू भालके या विद्यार्थीनीची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असून ती तिच्या या झाडू बनवण्याच्या कौशल्याद्वारे घरच्यांना देखील हातभार लावते . शाळेला लागणारे झाडू ही ती स्वतः तयार करून पुरवते . दिवसाकाठी सुमारे २० झाडू ती तयार करते. याचबरोबर अभ्यासात आणि इतर शालेय उपक्रमात ही ती नेहमीच अग्रेसर असते . 

तिच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष साळुंके, उपाध्यक्षा विद्या शिंदे , सर्व सन्माननीय सदस्य आणि पालकवर्ग यांनी कौतुक केले व तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

करमाळा तालुक्याचे उपक्रमशील गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब, कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील साहेब, विस्ताराधिकारी जयवंत नलवडे साहेब व सुग्रीव नीळ साहेब आणि पोथरे केंद्राचे केंद्रप्रमुख निशांत खारगे सर यांनी शाळेत हा अभ्यासपूरक उपक्रम राबवल्याबाबत शाळेचे व सानू भालके या विद्यार्थीनीचे विशेष अभिनंदन केले .

   हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. दत्तात्रय मस्तूद, श्रीम. शाबिरा मिर्झा, श्रीम.स्वाती गानबोटे, श्री. बापू रोकडे, श्रीम. सविता शिरसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

karmalamadhanews24: