राज्यात वादग्रस्त वक्तव्याचे पीक जोमात; जनता म्हणते.. ‘रोजचं मढं, त्याला कोण रडं.?’
केतूर ( अभय माने ) आपल्या राज्यातील आणि एकंदर देशातील राजकारणात काय कधी शिजेल याचा कोणालाच बोध होत नाही, सध्या महाराष्ट्रातील वादग्रस्त वक्तव्याचे पीक जोमात आले आहे, यासाठी मात्र महापुरुषांनाच आपली लक्तरे वेशीवर टांगावी लागत आहेत, सामान्य माणसांना या गोष्टींचा हळूहळू सराव होत असताना दिसतो, पण सुशिक्षित नागरिक किमान महापुरुषांची बदनामी करू नये अशी मागणी करीत आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणाच्या चिंद्या होत असताना राजकारणी लोकं आपली पोळी भाजण्यासाठी अनेक युक्त्या-क्लुप्त्या करतात,प्रसंगी एकमेकांवर शाब्दिक दगडफेक करतातच, तरीही देवी देवता आणि महापुरुष यांच्यावर सुद्धा ते तुटून पडतात.
तटस्थ मतदाराचे काही वेळा मनोरंजन होत असले तरी काही नागरिकांना देवी देवता व महापुरुष यांचा अवमान जिव्हारी लागतो, वैचारिक स्वातंत्र्याचा कायदा व त्याच्या पळवटा याची जाण असणाऱ्या नेत्यांना वादाचे सोयर-सुतक नसते, ” बदनामीच्या मिषाने चौघात नाव झाले.”
या कवितेप्रमाणे अधिक प्रसिद्धीसाठी असे नेते घसरत असतात. सामान्य नागरिकांना आपले मत जाहीरपणे व्यक्त करता येत नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा वादग्रस्त नेत्यांवर तुटून पडतात आणि आपला राग व्यक्त करतात.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर तर कधी नाही इतके वादग्रस्त वक्तव्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे.वैताग से त्रासलेले नागरिक कायद्याची अंमलबजावणी कडक व्हावी अशी अपेक्षा बाळगून आहेत.
महापुरुषांनी शौर्य,बुद्धिमत्ता,आणि कार्य दाखवले आहे. मग ते कोणत्याही धर्माचे,जातीचे वा प्रांताचे असोत, त्यांच्याबद्दल सर्वांनी आदर दाखवावा अशी अपेक्षा सामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
Comment here