जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आली एचआयव्ही संसर्गांच्या औषधांची सोय तसेच अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर देण्याच्या जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना
सोलापूर (१ जुलै) – जिल्ह्यातील अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा महिला
आणि बालविकास अधिकारी विजय खोमणे, जिल्हा एडस पर्यवेक्षक कृष्णा सकट, क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एम. सय्यद, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांच्यासह एआरटीचे सर्व वैद्यकीय अधिकारी, समितीचे सदस्य, सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एडस संसर्ग रूग्णांचे प्रमाण वाढू नये,
यासाठी नियमित तपासण्या करा. त्यांच्यावर योग्य उपचार करून औषधे कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. रूग्णांना असलेल्या सोयी-सुविधा देण्यावर भर द्या. एचआयव्ही संसर्ग रूग्णांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करा.
लहान बालकांच्या आहारासाठी निधी
एचआयव्ही संसर्ग बालकांना प्रोटीनयुक्त सकस आहाराची गरज आहे. निधीअभावी आहार मिळत नसल्याची बाब निदर्शनाला आल्यानंतर श्री. शंभरकर यांनी तत्काळ दखल घेत प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.
बालकांच्या आहारासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पुढील उपचाराची सोलापुरात सोय
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एचआयव्ही संसर्गांच्या औषधांची सोय करण्यात आली आहे. पुढील उपचारासाठी (सेकंड लाईन ट्रीटमेंट) जे.जे. हॉस्पिटल, मुंबईला रूग्णांना जावे लागत होते, जिल्ह्यात ही सोय उपलब्ध झाली आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून एचआयव्ही तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. तसेच कोरोना लसीकरणही मोबाईल व्हॅनद्वारे करण्यात येणार असल्याचे श्री. भुसारी यांनी सांगितले.
Comment here