रिक्षा घेण्यासाठी पैसे आण म्हणत सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ, उचलले टोकाचे पाऊल
पैशांसाठी होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जळकोट तालुक्यातील चिंचोली येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून लातूर जिल्ह्यातील जळकोट पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीहरी तुकाराम वाघमारे यांची मुलगी सायली हिचे लग्न 20 मे 2018 रोजी दत्ता भानुदास कांबळे याच्याशी झाले होते. लग्नानंतर सहा महिने तिला सासरी चांगले नांदवले. त्यानंतर नवरा दत्ता भानुदास कांबळे, सासू तुळसाबाई भानुदास कांबळे, सासरा भानुदास कांबळे, दीपक भानुदास कांबळे आणि जाऊ भाग्यश्री दीपक कांबळे हे तिला स्वयंपाक येत नाही, तु आम्हाला पसंत नाही असे म्हणून टोमणे मारून शिवीगाळ करू लागले. तसेच तिचा छळ करू लागले.
याबद्दल मुलीने आपल्या घरीही सांगितले होते. मात्र एखादे मुल झाल्यावर हे प्रकार बंद होतील असे म्हणत त्यांनी तिची समजूत काढली होती. मात्र एक मुलगी झाली तरी तिचा छळ थांबला नाही. ऑटो घेण्यासाठी माहेरवरून 80 हजार रुपये घेऊन यावेत म्हणून तिचा छळ करण्यात येत होता.
सासरच्या मंडळींच्या याच छळास कंटाळून साडीने घरातील पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Comment here