आरोग्यताज्या घडामोडीबार्शीमाळशिरससोलापूर जिल्हा

कोविड लसीकरणाचा ड्राय रन, शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात ‘या’ तीन ठिकाणी होणार लसीकरण; डॉ.पिंपळे यांची माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोविड लसीकरणाचा ड्राय रन, सोलापूर
जिल्ह्यात ‘या’ तीन ठिकाणी शुक्रवारी होणार लसीकरण; डॉ. पिंपळे यांची माहिती

सोलापूर, दि.7 : जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारी 2021 ला उपजिल्हा रूग्णालय, अकलूज, ग्रामीण रूग्णालय, बार्शी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी येथे कोविड लसीकरणाबाबतचा ड्राय रन होणार असल्याची माहिती कोविड लसीकरणाचे समन्वयक तथा जिल्हा माता, बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी आज दिली.

ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार आहे. ड्राय रनची तयारी पूर्ण झाली असून तिन्ही ठिकाणी 75 जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लसीकरण मतदान प्रक्रियेसारखे असेल. लसाकरण करणाऱ्या व्यक्तींना ऑनलाईनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिह्यात शासकीय आणि खाजगी 599 लसीकरण करणाऱ्या व्यक्ती असतील. लसीकरण बुथवर एकच व्यक्ती लसीकरण रूममध्ये असेल.

त्याच्याजवळील ओळखपत्र पाहून त्याची पडताळणी केली जाणार आहे. लसीकरण बुथवर पाच व्यक्ती असतील. सुरक्षा रक्षक लस घेणाऱ्याला तपासून आत सोडेल. ओळखपत्र तपासून समुदाय आरोग्य अधिकारी त्या व्यक्तीला लसीकरण करण्याची प्रक्रिया सांगेल.

लसीकरण करणारी त्या व्यक्तीला लस देईल. याची नोंद ऑनलाईन कोविड पोर्टलवर होईल. लसीकरणानंतर निरीक्षण रूममध्ये अर्धा तास ती व्यक्ती थांबेल. या काळात निरीक्षक हे त्या व्यक्तीला काही बाधा होऊ नये, यासाठी नजर ठेवून असतील, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

ओळखपत्र हवेच

लसीकरण घेण्यासाठी त्या व्यक्तीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, शासकीय ओळखपत्र, संस्थेचे ओळखपत्र, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असायला हवे.

लसीकरणानंतर रूग्णांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी रूग्णवाहिका तैनात असतील. शिवाय जिल्ह्यात 19 खाजगी दवाखाने सज्ज ठेवण्यात आले आहेत. लस देताना त्या व्यक्तीला काही सौम्य, गंभीर, अती गंभीर दुसरा काही आजार आहे का, याची नोंद ठेवली जाणार आहे. लसीकरण हे 7 ते 8 दिवस चालेल, ज्या व्यक्ती राहतील त्यांना पुढील टप्प्यात लस दिली जाईल.

एसएमएसची सोय

लसीकरणामध्ये पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका यांना लस दिली जाणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनचे कर्मचारी आणि कोमॉर्बिड रूग्ण असे या टप्प्यात लस दिली जाणार आहे. एका बुथवर 100 जणांनाच लस दिली जाईल. प्रत्येक बूथवर पाच जणांचे लसीकरण पथक असणार आहे.

लसीकरणादिवशी गर्दी, गोंधळ होऊ नये, यासाठी ज्यांना लस दिली जाणार आहे, त्यांना लसीकरणाचा दिवस एसएमएसद्वारे कळविला जाणार आहे. तसेच कोणत्या प्रकारची लस दिली, याचीही माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे, असेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लसीला मान्यता मिळाली असून या लसी देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी असे 1710 आरोग्य संस्था आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालये, अंगणवाडी कर्मचारी, खाजगी दवाखान्यांचा समावेश आहे.

litsbros

Comment here