(प्रतिनिधी) : कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागु होण्यासाठी शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने अन्यायी शासनाधोरणा विरोधात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कौंडण्यपुर येथे मंगळवारी जलसमर्पण आंदोलन केले. कौंडण्यपुर येथे वर्धा नदीच्या जलपत्रात हे जलसमर्पण आंदोलन करण्यात आले.
जुन्या पेंशनसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना रस्त्यावरची लढाई लढत आहे. पेन्शनग्रस्त बांधवांना जुनी पेंशन मिळवून देण्यासाठी सर्व शक्य मार्गाचा व आयुधांचा वापर केल्या जात असून मंगळवारी अमरावती विभागातील सर्व पेंशन ग्रस्त बांधवांनी कौंडण्यपुर येथे एकत्र येऊन वर्धा नदीच्या पात्रात जलसमर्पण आंदोलन करून शासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला.
जुनी पेंशन संबंधात विचारमंथन करण्यासाठी व शिक्षक महासंघाची जुन्या पेंशन बाबतची भूमिका ठरविण्यासाठी शिक्षक महासंघाच्या बुलडाणा, वाशिम, अकोला व यवतमाळ येथे अनुक्रमे दि.8, 9,10 व 13 मे रोजी सभा घेण्यात आल्या. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यापेक्षा शिक्षक महासंघाने व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने सभागृहाबाहेरची रस्त्यावरची लढाई लढावी व शासनाला जुन्या पेन्शनची घोषणा करण्यास बाध्य करावे असे निश्चीत करण्यात आले.
याच आंदोलनाचा एक भाग म्हनून विभागातील शेकडो शिक्षक व राज्यसरकारी कर्मचाऱ्यांनी कौंडण्यपुर येथे वर्धा नदीच्या पात्रात जल समर्पण आंदोलन केले. राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना बंद केली आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अमरावती विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हे जल समर्पण आंदोलन प्रतीकात्मक असून शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक महासंघ व जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या तर्फे देण्यात आला आहे.
Comment here